जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता




१०१ बेरोजगार सुरक्षा रक्षक १० वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत

जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता

पत्रकार परीषदेत मनसे कामगार सेना चे प्रदेश उपाध्यक्ष भोयर यांचा आरोप

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर ब्युरो.

जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, मंडळ अधिकारी नोकरी च्या शोधात असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून २.५० ते 3 लाख रुपये उकळत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात मनसे कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भोयर यांनी पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि संबंधित कर्मचा_यांवर कठोर कारवाईची मागणी केली.

त्यांनी सांगितले की, खाजगी संस्थांमध्ये नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळावा आणि नोकरीतील शोषण रोखण्यासाठी, राज्य सरकारने २०१२ मध्ये महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नियमांनुसार चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना केली. कामगार विभाग मंडळाच्या अंतर्गत सुरक्षा रक्षकांच्या कल्याणाची भरती आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार आहे. सहाय्यक कामगार आयुक्त हे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि सरकारी कामगार अधिकारी हे सचिव आहेत. सुरक्षा रक्षकांची वेळोवेळी नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांना खाजगी सुरक्षा सेवांमधील नोकरीचा पुरावा, आवश्यक कागदपत्रे, खाजगी एजन्सीकडून १८० दिवसांची उपस्थिती, पीएफ, ईएसआयसी, पेमेंट स्लिप, पगार बिले, पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ही संपूर्ण प्रक्रिया सरकारी आदेश आणि कामगार आयुक्त कार्यालयाच्या अनुषंगाने आहे. तथापि, भोयर यांनी मंडळ अधिका_यांवर इच्छुक उमेदवारांकडून २.५० ते 3 लाख रुपये स्वीकारून बनावट भरती केल्याचा आरोप केला. या संदर्भात भोयर यांनी पदाधिका_यांनी पैसे स्वीकारण्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ फुटेज सादर केले. पात्र उमेदवारांना बाजूला सारून बोगस भरती करून शेकडो बेरोजगार तरुणांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर सीटीपीएसमध्ये पूर्वी एका खाजगी एजन्सी ने नियुक्त केलेले १०१ सुरक्षा रक्षक मंडळा कडे नोंदणीकृत नाहीत. सरकारच्या स्पष्ट सूचना असूनही, संबंधित कार्यालय व मंडळाने सुरक्षा रक्षकांची नावे नोंदवण्यासाठी कारवाई केलेली नाही. यामुळे या रक्षकांचा रोजगार आणि उपजीविका धोक्यात आली आहे. शिवाय, खाजगी एजन्सीमध्ये पूर्वी नियुक्त केलेल्या मूळ सुरक्षा रक्षकांना बाजूला करून सरकारी रुग्णालयात बनावट सुरक्षा रक्षकांची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आल्याचे आरोप समोर आले असल्याचे भोयर यांनी सांगीतले. आर्थिक व्यवहारांद्वारे मेटल उद्योग, तांदूळ गिरण्या, वाहतूक, महावितरण आणि आरोग्य विभागातील व्यक्तींसाठी बनावट शिफारस पत्रे तयार केली जात आहेत. मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि संबंधित कर्मचा_यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काही व्यक्तींशी संगनमत करून बनावट सुरक्षा रक्षकांची भरती आणि नियुक्ती केली असल्याचा आरोप भोयर यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आणि जबाबदार असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी सरकारने तात्काळ चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणी मनसे कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भोयर यांनी केली आहे.

पत्र परिषदेत माजी नगराध्यक्ष आणि मनसे कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन भोयर, नितीन भोयर, राजेश गायकवाड, बापूसाहेब जावळे, समीर पठाण इत्यादी उपस्थित होते.

दिनचर्या