दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र देण्यासाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 20 : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांचे एकुण 21 प्रकार आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID Card) बंधनकारक करण्यात आले आहे. वैश्विक ओळखपत्र असल्याशिवाय दिव्यांगांना कोणताही लाभ देता येणार नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे (युडीआयडी) वैश्विक ओळखपत्र नाही, अशा लाभार्थ्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तालुकानिहाय सुध्दा शिबीर घेण्यात येणार आहे.
*असे आहे तालुकानिहाय वेळापत्रक :* पंचायत समिती कोरपना / जिवती येथे 3 डिसेंबर रोजी, पंचायत समिती ब्रम्हपुरी /चिमुर येथे 4 डिसेंबर रोजी, पंचायत समिती मुल /पोभुर्णा येथे 10 डिसेंबर रोजी, पंचायत समिती भद्रावती/ गोंडपिपरी/ राजुरा येथे 11 डिसेंबर रोजी, पंचायत समिती सिंदेवाही / नागभिड येथे 17 डिसेंबर रोजी आणि पंचायत समिती सावली येथे 18 डिसेंबर 2025 रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय सर्व तालुक्यातील शिल्लक दिव्यांग लाभार्थ्यांकरीता 24 डिसेंबर, 26 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2025 रोजी शिबीर प्रस्तावित आहे. वरील वेळापत्रकाप्रमाणे शिबीर घेऊन दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र/वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) बाबत शासनाचे दिनांक 25 जुन 2018 नुसार नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती/ ग्रामपंचायत च्या 5 टक्के निधीतुन दिव्यांग लाभार्थ्याना ने-आण करण्याची जबाबदारी राहील. सदर शिबिरापासून कोणताही लाभार्थी वंचित राहु नये, याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धंनजय साळवे यांनी कळविले आहे.
दिनचर्या
