व्यवस्थापकीय संचालक झुरमुरे यांनी केली टायगर सफारीच्या ५१५ हेक्टर क्षेत्राची पाहणी, आ. जोरगेवार यांच्यासह बैठक




आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर टायगर सफारीच्या प्रकल्पाला गती.

एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक झुरमुरे यांनी केली टायगर सफारीच्या ५१५ हेक्टर क्षेत्राची पाहणी, आ. जोरगेवार यांच्यासह बैठक.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरच्या दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला अखेर गती मिळत आहे. नुकत्याच आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर, आज एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी चंद्रपूर येथे विशेष भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह त्यांनी वन अकादमी लगतच्या टायगर सफारीच्या जागेची पाहणी केली.
यावेळी मुख्य वनसंरक्षक आर.एम. रामानुजम, प्रादेशिक व्यवस्थापक दिव्यभारती एम., विभागीय वन अधिकारी राजन तलमले, विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, सहाय्यक व्यवस्थापक व्यंगटरमन जंगीलवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, प्रदेश निमंत्रित सदस्य तुषार सोम, अजय जैस्वाल, बलराम डोडाणी, श्याम धोपटे, महामंत्री मनोज पाल, रविंद्र गुरुनुले, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष राशिद हुसेन, महिला अध्यक्ष कौसर खान, सायली येरणे, देवानंद वाढई, श्याम धोपटे, अरुण तिखे, संजय बुरघाटे, संजीव सिंग, कार्तिक बोरेवार, दिनकर सोमलकर, प्रलय सरकार आदींची उपस्थिती होती.
यावेळी वन विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत टायगर सफारी प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर झुरमुरे यांनी अधिकार्‍यांसह ५१५ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी टायगर सफारीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. सुमारे ६०० कोटी रुपयांच्या निधीतून उभारला जाणारा हा प्रकल्प चंद्रपूरच्या आर्थिक, पर्यटन आणि पर्यावरणीय विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन रोजगारनिर्मिती, पर्यटन वाढ आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जगभरातील पर्यटक चंद्रपूरकडे आकर्षित होतील आणि वाघनगरी चंद्रपूरचे जागतिक पर्यटन नकाशावर स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. हा टायगर सफारी प्रकल्प राज्य शासनाच्या विशेष प्राधान्यक्रमावर असून, लवकरच त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहितीही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. सदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम लवकरच सुरू करू, असे यावेळी एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्हा हा वन, वाघ आणि पर्यावरण यांचा संगम असलेला जिल्हा आहे. येथे उभारण्यात येणारा हा टायगर सफारी प्रकल्प फक्त पर्यटन वाढविणारा उपक्रम नसून, तो चंद्रपूरच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया ठरणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे चंद्रपूर शहरातील व्यापारी, हॉटेल उद्योग आणि स्थानिक उत्पादन क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.