गुंजेवाही जंगलात चार महिलांचा वाघाने घेतला बळी !


गुंजेवाही जंगलात चार महिलांचा वाघाने घेतला बळी !

“सर्वाधिक मानव वन्यप्राणी संघर्ष आणि मृत्यू होणारा जिल्हा अशी ओळख- बंडू धोतरे

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात आज सकाळी 8च्या दरम्यान वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलांची नावे
संगीता संतोष चौधरी,कवळाबाई दादाजी मोहुर्ले,
अनुबाई दादाजी मोहुर्ले,सुनिता कौशिक मोहुर्ले

घटनेची माहिती मिळताच वनविभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांना जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे गुंजेवाही आणि आसपासच्या गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने अनेक महिला व पुरुष रोज जंगलात जात असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
चार निरपराध महिलांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे


“सर्वाधिक मानव वन्यप्राणी संघर्ष आणि मृत्यू होणारा जिल्हा अशी ओळख :- बंडू धोतरे


आज सकाळी सिंदेवाही वनक्षेत्रात एकसाथ चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मागील पाच वर्षात जिल्ह्यात २०० व्यक्ती (२०२१-२०२५) तर यंदा १९ व्यक्ती (२०२६ - मात्र ५ महिन्यात) मृत्यू आहे. २१९ हा फक्त आकडा नाही तर उध्वस्त परिवाराची संख्या सुद्धा आहे.यावर सानुग्रह मदतनिधी देणे, ती अधिक देणे पर्याय नसून यावर कायमस्वरूपी उपाय अमलात आणावा लागेल. त्यासाठी शासनाने कठोर निर्णय घेतले पाहिजे. कायम या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, यावर उपाययोजना व्हावी.“सर्वाधिक मानव वन्यप्राणी संघर्ष आणि मृत्यू होणारा जिल्हा अशी ओळख निर्माण झाली आहे, हे चित्र योग्य नाही. २०२० ला राज्य सरकारने गठीत केलेली राज्यस्तरीय चंद्रपूर जिल्हा वाघ-मानव संघर्ष समिती अहवाल प्राप्त होऊन पाच वर्ष लोटले आहे, अद्याप अमलबजावणी नाही. जिल्ह्यात वाघ संख्या अधिक आहेच तसेच ब्रह्मपुरी वनविभाग मधील वाघाची संख्या सर्वाधिक आहे, या वन विभागाची वाघाची ‘केरिंग कॅपिसिटी’ (वहन क्षमता) लक्षात घेता, ती तिप्पट आहे म्हणजे सर्वाधिक आहे, येथे सातत्याने संघर्ष होत राहील यासाठी या वनविभाग आणि वाघाची संख्या अभ्यास करून उपाययोजना करणे आवश्यक आहे.”

नुकतेच जिल्ह्यातील वरील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या प्रलंबित मागण्याकरिता “अन्नत्याग सत्याग्रह”आंदोलन करण्यात आले होते. त्यावर अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही.बंडू धोतरे,इको-प्रो चंद्रपूर