“योग हीच काळाची गरज” : माजी उपमहापौर राहुल पावडेंचे आवाहन
जागतिक योग दिनानिमित्त नवजीवन योग मंडळातर्फे भव्य योग प्रात्यक्षिकांचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 21 जून : जागतिक योग दिनानिमित्त मातोश्री लोन, जगन्नाथ बाबा नगर येथे नवजीवन योग मंडळाच्या वतीने भव्य योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक तथा माजी उपमहापौर राहुल पावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना राहुल पावडे म्हणाले की, “निरोगी आणि आनंदी जीवनासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने दररोज किमान 30 मिनिटे योगासाठी दिल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.”
तसेच त्यांनी *पंतप्रधान नरेंद्र मोदी* आणि योगगुरू *स्वामी रामदेव* यांच्या प्रयत्नांमुळे योगाला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळाल्याचे सांगितले. “भारताची प्राचीन योग परंपरा आज जगभर पोहोचली आहे. योग हा केवळ व्यायाम नसून उत्तम जीवनशैलीचा आधार आहे. प्रत्येक नागरिकाने योग आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान नवजीवन योग मंडळाच्या सदस्यांनी विविध योगासने, सूर्यनमस्कार तसेच प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थित नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत योगाचे महत्त्व जाणून घेतले.
या प्रसंगी परिसरातील नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवजीवन योग मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
