नगीनाबाग प्रभागातील वीज समस्येवर तातडीची दखल; नवीन ट्रान्सफॉर्मर व विद्युत कामांना गती - राहुल पावडे
दिनचर्या न्युज :
चंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसांत नगीनाबाग प्रभागातील सिस्टर कॉलनी, चोर खिडकी, ठक्कर कॉलनी, स्वावलंबी नगर, महसूल कॉलनी, नीरज कॉलनी, विश्वकर्मा कॉलनी, जे.बी. नगर तसेच इतर परिसरात ओव्हरलोडमुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेत संबंधित भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात आला.
याबाबत महावितरणच्या स्थानिक अभियंत्यांशी तसेच वरिष्ठ स्तरावरील मुख्य अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे व थेट चर्चा करून नागरिकांच्या अडचणी निदर्शनास आणून देण्यात आल्या. तसेच संबंधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करून वीज पुरवठ्यातील अडचणींचा आढावा घेण्यात आला.
ओव्हरलोडची समस्या दूर करण्यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविणे, नवीन विद्युत खांब उभारणे, नवीन विद्युत वाहिन्या टाकणे तसेच आवश्यक दुरुस्ती व देखभाल (मेंटेनन्स) कामे तातडीने हाती घेण्याबाबत महावितरण प्रशासनाकडे पाठपुरावा मा. राहुलभाऊ पावडे यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
महावितरण विभागामार्फत लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन पोल, नवीन विद्युत वाहिन्या व इतर आवश्यक देखभाल कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या उपाययोजनांमुळे प्रभागातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात वीज पुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या विषयात केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त करत लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
