जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी
आंदोलनावर लाठीचार्ज,
राहुल गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन
गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी व अन्य वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसच्या निवेदनानुसार, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन शांततापूर्ण सुरू असताना पोलिसांनी लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांवर तसेच निषेधार्थत सहभागी झालेल्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, या कारवाईला लोकशाहीविरोधी व निषेधार्ह असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर लोकशाही मूल्यांची पायमल्ली केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली. संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी तसेच जखमी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, माजी अध्यक्ष रामू तिवारी, प्रवीण पडवेकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे, काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
