.. महाराजस्व अभियानातून नागरिकांना एकाच छत्राखाली सर्व सोयीसुविधा
चंद्रपूर तहसील कार्यालयाचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 22 : नागरिकांना शासनाच्या सर्व सेवा एकाच जागेवर उपलब्ध व्हाव्यात, शासकीय कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नये, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. याच अनुषंगाने चंद्रपूर तहसील कार्यालयाच्यावतीने आज (दि. 22) शहरातील गांधी चौक येथे महाराजस्व अभियान घेण्यात आले. विशेष म्हणजे गत दोन दिवसांपासून चंद्रपुरात पावसाची संततधार असतांनाही भर पावसात नागरिकांनी महाराजस्व अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, तहसीलदार विजय पवार, प्रा. अशोक जिवतोडे, सुभाष कासनगोट्टुवार, माजी महापौर अर्चना डेहनकर आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना आमदार श्री. जोरगेवार म्हणाले, रयतेसाठी रामराज्य आणि शिवराज्याची संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार काम करीत आहे. शासकीय कामासाठी नागरिकांना अनेकदा कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. आता मात्र एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहे. महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विविध प्रमाणपत्रांचे वाटप होत आहे. 20 प्रकारच्या लाभार्थ्यांना या अभियानात लाभ देण्यात येणार असून सर्व घटकांना न्याय देण्याची अधिका-यांची भुमिका कौतुकास्पद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना पट्टे वाटपाचे काम सुरू झाले आहे. नागरिकांनी त्वरीत कागदपत्रांची पुर्तता करावी. तसेच आज ज्यांना लाभ मिळाला आहे, त्यांनी शासकीय योजनांची माहिती इतरांना सांगून योजनांच्या लाभासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन आमदार जोरगेवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार तहसीलदार विजय पवार यांनी मानले.
*लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ :* जिल्हा मध्यवर्तीं सहकारी बँकेकडून पंचशील महिला बचत गट, शारदा महिला बचत गट, मैत्री महिला बचत गट, महालक्ष्मी महिला बचत गट यांना कर्ज वाटपाचे प्रमाणपत्र, लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत शंकर बुराण, हिरालाल लोनगाडगे, सुनील उरकुडे यांना प्रमाणपत्र, जिवंत सातबारा अंतर्गत बाबा वैद्य यांना लाभ, श्रवणबाळ योजनेंतर्गत सुर्यभान देवाळकर, दीपक घुगरे, माया येडे यांना, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सचिन देठे यांना, राशनकार्ड वाटप अंतर्गत कल्पना तोडासे, कुंदा नेवलकर, सुषमा जगताप यांना लाभ देण्यात आला.
*गोंडपिपरी येथेही महाराजस्व अभियान :* गोंडपिपरी तालुक्यातील राळापेठ येथे आमदार देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी आनंदा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 324 शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 ते वर्ग 1 रुपांतर करून 7/12 वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार शुभम बाहकर यांनी केले. यावेळी महिला व बालविकास, कृषी विभाग, सेतु शाखा, श्रावणबाळ/संजय गांधी निराधार अंतर्गत विविध लाभाचे वितरण करण्यात आले.
००००००
