आश्रमशाळेतील निष्काळजीपणामुळे
३१ विद्यार्थ्यांना विषबाधा
जिवती तालुक्यातील नगराळा येथील घटना
राजुरा रुग्णालयात उपचार सुरू
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील नगराळा येथील
आश्रम शाळा ही इतर मागास बहुजन कल्याण विभागाची (VJNT)आहे.
जेवणात पाल पडून शिजवल्यामुळे आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत घडली. या घटनेने पालक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नेहमीप्रमाणे दुपारी जेवण देण्यात आले होते. मात्र जेवण बनवताना त्यात पाल पडली होती. याकडे दुर्लक्ष करून तेच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाढण्यात आले, असा आरोप केला जात आहे. जेवणानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, पोटदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे दिसू लागल्याने शाळा प्रशासनाने बाधित विद्यार्थ्यांना तातडीने राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. ३१ मुलांवर उपचार सुरू आहे. शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर आणि संस्थाचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
