लोहारा सफारी गेट परिसरात फुलपाखरू सर्वेक्षण; ३० प्रजातींची नोंद
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी श्री. राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय वनाधिकारी श्री. विकास तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. घनश्याम नायगमकर आणि मुकेश भांदककर, मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोहारा सफारी गेट परिसरात फुलपाखरू सर्वेक्षण उपक्रम घेण्यात आला.
या सर्वेक्षणामध्ये परिसरातील फुलपाखरांच्या विविध प्रजातींची पाहणी व नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात फुलपाखरांच्या तब्बल ३० प्रजाती आढळून आल्या.
या उपक्रमात वनरक्षक श्री. रुपेश बैनलवार, फुलपाखरू तज्ञ श्री. बंडू दुधे आणि श्री. संजय शेगावकर यांचा सहभाग होता. तसेच लोहारा सफारी गेटचे गाईड देखील या सर्वेक्षणात सहभागी झाले.
फुलपाखरे ही जंगलातील जैवविविधतेचा महत्त्वपूर्ण घटक असून, त्यांच्या विविधतेच्या अभ्यासातून परिसरातील पर्यावरणीय स्थिती समजून घेण्यास मदत होते. लोहारा परिसरात आढळलेल्या ३० फुलपाखरू प्रजाती या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे द्योतक आहेत.
या सर्वेक्षणातून फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद, त्यांचा अधिवास आणि संवर्धनासाठी आवश्यक बाबींचा अभ्यास करण्यास मदत झाली. तसेच वनकर्मचारी, फुलपाखरू तज्ञ आणि सफारी गाईड यांच्या सहभागामुळे जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासही हातभार लागला.
