चंद्रपुरात 20 व 21 डिसेंबरला तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन





चंद्रपुरात 20 व 21 डिसेंबरला तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, :-
साहित्य, संस्कृती, सामाजिक समता आणि आंबेडकरी विचारांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रभावी साहित्य मंच म्हणून ओळख निर्माण करणारे तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन–2025 येत्या शनिवार, दि. 20 व रविवार, दि. 21 डिसेंबर 2025 रोजी चंद्रपूर येथे भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन; महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई तसेच लोकजागृती नाट्यकला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्य सभागृह येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

पहिले व दुसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन प्रचंड उत्साहात व विचारमंथनाच्या वातावरणात पार पडले होते. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे तर दुसऱ्या संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे होते. या संमेलनांना राज्यभरातून साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक व रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्या परंपरेला पुढे नेत तिसऱ्या संमेलनाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून या संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. अनिरुद्ध वनकर व त्यांची संपूर्ण संयोजन समिती जोमाने कार्यरत आहे.

या संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे भव्य ग्रंथदिंडी. दि. 20 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता चंद्रपूर बसस्थानक ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहापर्यंत लोककलावंत, विद्यार्थी, लेखक, साहित्यिक व सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागाने ही ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. वाचनसंस्कृती आणि वैचारिक चळवळीचा हा एक सशक्त संदेश ठरणार आहे.

संमेलनाचा उद्घाटन सोहळा सायंकाळी 5.30 वाजता माननीय श्याम तागडे (सेवानिवृत्त अधिकारी, माजी अपर मुख्य सचिव – गृह विभाग, लेखक व प्रमुख धम्म शिक्षक, अध्यक्ष – प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान) यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार लक्ष्मण गायकवाड भूषविणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबईचे डॉ. प्रदीप ढवळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी विनय गौडा, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, प्रा. डॉ. इसादास भडके, प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, डॉ. राजेश दहेगावकर तसेच ज्येष्ठ साहित्यिक रोहित जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे.

पहिल्या दिवशी सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ कवी-नाटककार इ. मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून विविध पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे नामवंत कवी सहभागी होणार आहेत. रात्री 8 वाजता ‘मी रमाई बोलते’ हे प्रभावी एकपात्री नाटक सादर होणार असून त्यानंतर ‘दलित साहित्य प्रवाहात कादंबरी का फुलली नाही?’ या विषयावर अभ्यासपूर्ण परिसंवाद होणार आहे. रात्री ‘जय भीम जलसा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे.

दि. 21 डिसेंबर रोजी कथाकथन, कवी संमेलन, मराठी गझल संमेलन आणि सायंकाळी साडेसात वाजता फ्रांझ कापका यांनी लिहिलेलं ढसाळांचा पॅंथर हे एकपात्री नाटक सम्यक बनकर सादर करणार आहे. तसेच ‘समकालीन मराठी साहित्य आणि जात वास्तव’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ‘जय भीम रत्न पुरस्कार’ वितरण व समारोप समारंभ पार पडेल.

संमेलनाच्या समारोपाला महाराष्ट्रात विशेष चर्चेत असलेले ‘द ग्रेट कार्यकर्ता’ हे दीड तासांचे नाटक सादर करण्यात येणार आहे. मुरलीधर जाधव यांच्या कादंबरीवर आधारित या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व संगीत डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी केले असून लोकजागृती संस्था, चंद्रपूर यांची ही निर्मिती आहे. या नाटकात एकूण वीस कलाकार सहभागी होणार आहेत.

हे संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम नसून सामाजिक न्याय, समता, मानवता व संविधानिक मूल्यांच्या जागरणाचे व्यासपीठ ठरणार आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांसह परिसरातील सर्व नागरिकांनी, युवकांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि साहित्यप्रेमींनी या दोन दिवसीय वैचारिक व सांस्कृतिक महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य संयोजक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.