रूढी–परंपरांना बगल देत प्रथम पुण्यस्मरणाला समाजोपयोगी इतिहास घडविला




रूढी–परंपरांना बगल देत प्रथम पुण्यस्मरणाला समाजोपयोगी इतिहास घडविला


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर | प्रतिनिधी

गडचांदूर येथील स्वर्गीय श्री. प्रशांत विठ्ठलराव झाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पारंपरिक धार्मिक विधींना बगल देत समाजाला नवी दिशा देणारा उपक्रम राबविण्यात आला. स्वर्गीय प्रशांत झाडे यांच्या पत्नी श्रीमती सीता चंद्रशेखर गौरकार (झाडे) यांनी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी वरोरा नाका येथील पत्रकार भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
श्री. प्रशांत झाडे यांचे लग्न श्रीमती सीता गौरकार यांच्यासोबत झाले होते. संसार सुरळीत सुरू असताना अचानकपणे दुर्मिळ आजाराने त्यांना ग्रासले. दोन वर्षांच्या प्रदीर्घ उपचारानंतरही नियतीने घाला घातला आणि ते स्वर्गवासी झाले. त्यांच्या जाण्याने कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजावर शोककळा पसरली.
प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी रूढीपरंपरेनुसार कार्यक्रम न करता रक्तदानासारखा मानवतेचा उपक्रम राबवून श्रीमती सीता गौरकार यांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला. या रक्तदान शिबिरात पंचायत समिती भद्रावतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, ही बाब विशेष अभिनंदनीय ठरली.

या रक्तदान शिबिराचे अध्यक्ष म्हणून श्री. धनंजय साळवे, गटविकास अधिकारी, बल्लारपूर उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून श्री. आशुतोष सपकाळ, गटविकास अधिकारी, भद्रावती यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. प्रमुख अतिथी म्हणून श्री. टोंगे, उपमुख्याध्यापक तसेच रक्तसंग्रामण पिढी टीमच्या प्रमुख डॉ. कोमल जटाळे यांची उपस्थिती लाभली.
हा उपक्रम समाजात जुन्या रूढी-परंपरांना छेद देत सकारात्मक आणि मानवतेचा संदेश देणारा ठरला आहे. श्रीमती सीता गौरकार यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत असून, हा उपक्रम समाजासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.