घुग्घुसच्या ३२ आशा स्वयंसेविकांचे बेमुदत धरणे आंदोलन
कोरोना काळातील थकीत मानधनासाठी १३ दिवसांपासून आंदोलन; नगरपरिषद सभागृहात गदारोळानंतर तीन दिवसांची मुदत
दिनचर्या न्यूज | घुग्घुस प्रतिनिधी :
कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावलेल्या घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रातील ३२ आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कामाचे थकीत मानधन अद्याप पूर्णपणे मिळाले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. थकीत मानधनाच्या मागणीसाठी आशा स्वयंसेविकांनी ४ नोव्हेंबर २०२६ पासून घुग्घुस आठवडी बाजार रंगमंच येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला आज १३ दिवस पूर्ण झाले आहेत.
कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आशा स्वयंसेविकांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले. मात्र, त्यांच्या या सेवेचे मानधन अद्याप पूर्णपणे मिळाले नसल्याने “आशा स्वयंसेविकांचा सन्मान करा, त्यांच्या हक्काचा पैसा द्या” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
थकीत मानधनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नगरपरिषदेत झालेल्या बैठकीदरम्यान चांगलाच गदारोळ झाला. यावेळी आंदोलनकर्त्या आशा स्वयंसेविकांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडत थकीत मानधन तातडीने देण्याची मागणी केली. त्यानंतर नगराध्यक्षांनी आशा स्वयंसेविकांची बाजू समजून घेत तीन दिवसांचा कालावधी देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना काळातील एकूण थकीत मानधनाबाबत यापूर्वी काही महिन्यांचे मानधन अदा करण्यात आले आहे. तसेच उर्वरित मानधनासाठी सभेची कार्योत्तर मंजुरी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. उर्वरित मानधन मंजूर करून त्याचे बिल अदा करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
उर्वरित दहा महिन्यांचे मानधन अदा करण्यात आले असून, आणखी १२ महिन्यांच्या थकीत मानधनासाठी आवश्यक मंजुरी घेऊन बिल अदा करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
बैठकीस नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश रांजणकर, नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, बांधकाम सभापती रोशन पचारे, सिद्दिकी, विवेक बोडे यांच्यासह नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
तीन दिवसांत निर्णयाची अपेक्षा
आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून तीन दिवसांचा कालावधी देण्यात आल्याने आता या मुदतीत थकीत मानधनाबाबत प्रत्यक्ष निर्णय होतो का, याकडे ३२ आशा स्वयंसेविकांचे लक्ष लागले आहे. कोरोना काळात सेवा बजावलेल्या आशा स्वयंसेविकांना त्यांच्या हक्काचे संपूर्ण मानधन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
