येता काही दिवसात, चंद्रपूरच्या महापौरपदाबाबत मनस्वी गि-हे यांचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन व उत्कृष्ट वृत्तांत स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात शिवसेनेच्या नेत्या मनस्वी गि-हे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
पत्रकारांच्या विविध समस्या आणि प्रश्नांवर बोलताना मनस्वी गि-हे यांनी आगामी काळात चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाबाबत सूचक वक्तव्य केले. “आपल्या आशीर्वादाने येत्या काही दिवसांत मी चंद्रपूर महानगरपालिकेची महापौर बनणार आहे,” असे त्यांनी कार्यक्रमात सांगितल्याने त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेतील आगामी सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्या संख्याबळाची रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे पाठबळ सत्तास्थापनेसाठी महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळे महापौरपदाच्या समीकरणात शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर मनस्वी गि-हे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात काही दिवसांतच महापौर होण्याचे संकेत दिल्याने आगामी काळात चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात कोणते नवे समीकरण आकाराला येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनस्वी गि-हे यांच्या वक्तव्यामुळे महापौरपदाच्या चर्चेला नवे वळण मिळाले असून, काँग्रेस-भाजपच्या संख्याबळाच्या गणितात शिवसेनेची भूमिका किती निर्णायक ठरते, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
