कारवां आणि चोरा क्षेत्रातील सफारीत गोलमाल : ऑनलाईन हे फक्त निमित्त; खरा खेळ तर 'जबाबदार अधिकाऱ्या'च्या फोनवरूनच?




कारवां आणि चोरा क्षेत्रातील सफारीत गोलमाल : ऑनलाईन हे फक्त निमित्त; खरा खेळ तर 'जबाबदार अधिकाऱ्या'च्या फोनवरूनच?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचे आणखी एक धक्कादायक रूप समोर आले आहे. आतापर्यंत ताडोबाच्या नावाने गुगलवर बनावट वेबसाईट तयार करून पर्यटकांना गंडा घालण्याचा प्रकार सुरू होता. मात्र या रॅकेटच्या खोलात गेल्यावर जे तथ्य समोर आले, त्यामुळे वन विभागापासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रश्न असा उपस्थित होत आहे की, ताडोबात सुरू असलेला हा फसवणुकीचा प्रकार विभागीय आशीर्वादाशिवाय शक्य आहे का?
स्टिंग ऑपरेशन : बनावट वेबसाईटपासून 'कारवां-चोरा' बुकिंगपर्यंतचा खेळ
या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने एका बनावट वेबसाईटची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. वेबसाईटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता बनावट एजंटने तात्काळ बुकिंग स्वीकारले आणि ऑनलाईन पेमेंटची प्रक्रिया ई-मेलवर पाठवली.
प्रतिनिधीने ताडोबाच्या कोअर झोनची बुकिंग मागितली असता, एजंटने कोअर फुल्ल असल्याचे सांगून 'कारवां' आणि 'चोरा' गेटची बुकिंग उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रतिनिधीने या संपूर्ण संभाषणाचे आणि बुकिंगच्या पद्धतीचे स्टिंग ऑपरेशन करून ऑडिओ रेकॉर्ड केले असल्याचा दावा केला आहे.

वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे गोलमोल उत्तर
या संदर्भात अधिकृत माहितीसाठी वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) राजेंद्र गोरुडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्या वेबसाईट आणि एजंटला पूर्णपणे 'फ्रॉड' असल्याचे सांगत पल्ला झाडला. त्यांनी ठामपणे सांगितले की -
> "कारवां आणि चोरा परिसरात ऑनलाईन बुकिंगची कोणतीही सुविधा नाही. तिथे केवळ ऑफलाईन (काउंटरवर येऊन) बुकिंगच होते. या वेबसाईटशी आमचा काहीही संबंध नाही." असे संबंधित माध्यमांना सांगितले!

मात्र खरी चर्चा यानंतर सुरू होते.
सर्वात मोठा प्रश्न : नियम 'ऑफलाईन'चा असताना फोनवर बुकिंग का आणि कशी? याबाबत संबंधित सफारीदारा कडे चौकशी केली असता. ऑनलाइन आणि बनावट वेबसाईटचा पूर्णपणे नाकारली जात असून दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच कथा सांगत आहे.
कारवां आणि चोरा क्षेत्रात ऑफलाईन बुकिंगचा नियम असतानाही, सर्रासपणे फोनवर बुकिंग स्वीकारली जात असल्याची माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा परिणाम असा होत आहे की, दूरदूरवरून ताडोबा सफारीचे स्वप्न घेऊन येणाऱ्या पर्यटकांना बुकिंग न मिळाल्याने निराश होऊन परत जावे लागतं. किंवा या कथित फ्रॉड ऑनलाइन चा फटका सफारीसाठी येणाऱ्या न बसतो . मग हे सर्व या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सुरू आहे का? असा प्रश्नही आता पर्यटकांना पडला आहे.
सूत्राच्या माहितीनुसार या वनपरिक्षेत्रातील अधिकारीच फोनवरून बुकिंग घेत असल्याचे गंभीर संकेत समोर येत आहेत. त्यामुळे या वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.

कारण नियम स्पष्ट असताना की 'कारवां' आणि 'चोरा' ची बुकिंग केवळ जागेवर (ऑफलाईन) येऊनच होऊ शकते, मग फोनवर बुकिंग कन्फर्म होण्याचा खेळ कसा सुरू आहे? वन परिक्षेत्र अधिकारी स्वतः या अनधिकृत आणि संशयास्पद बुकिंग प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत का? की त्यांच्या नावाचा आणि पदाचा वापर करून विभागातच कोणी मोठे सिंडिकेट चालवत आहे, जे पर्यटकांच्या भावनांशी आणि ताडोबाच्या प्रतिष्ठेशी खेळत आहे? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
निष्कर्ष आणि इशारा
एकीकडे ताडोबाच्या नावाने फसवणूक करणारे बनावट वेबसाईट चालक सक्रिय आहेत, तर दुसरीकडे विभागीय पातळीवर नियम पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप होत आहे. जर जबाबदार अधिकारीच अशा संशयास्पद प्रकारात अडकलेले दिसले, तर पर्यटकांचा ताडोबावरील विश्वास उडणे निश्चित आहे.
आता पाहायचे हे आहे की, या स्टिंग ऑपरेशन आणि ऑडिओ खुलाशानंतर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शासन या प्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी आणि या फसवणुकीशी जोडलेल्या इतर चेहर्‍यांवर काय कठोर कारवाई करतात? याकडे पर्यटकांचे लक्ष लागले आहे.