महाकाली मंदिर परिसरात स्टॅंडर्ड वाईन शॉपचे उद्घाटन; बारमालकांसह मद्यविक्रेत्यांची डोकेदुखी वाढली! धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा मुद्दा ऐरणीवर; स्थलांतर रद्द करण्यासाठी तक्रारी ठरल्या फेल ! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा



महाकाली मंदिर परिसरात स्टॅंडर्ड वाईन शॉपचे उद्घाटन; बारमालकांसह मद्यविक्रेत्यांची डोकेदुखी वाढली!

धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा मुद्दा ऐरणीवर; स्थलांतर रद्द करण्यासाठी तक्रारी ठरल्या फेल !
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

दिनचर्या न्यूज |
चंद्रपूर :
चंद्रपूर शहरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता महाकाली मंदिर परिसरात स्टॅंडर्ड वाईन शॉपचे भव्य उद्घाटन झाल्याने शहरात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. या दुकानाच्या स्थलांतरावरून यापूर्वीच वाद निर्माण झाला होता. परिसरातील नागरिकांसह स्थानिक नगरसेवक आणि मद्यविक्री व्यवसायाशी संबंधित काही व्यावसायिकांनी या दुकानाचे स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, विरोध आणि तक्रारींकडे दुर्लक्ष करून अखेर या ठिकाणी वाईन शॉप सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसरातील विद्यमान वाईन बार आणि देशी दारू विक्रेत्यांमध्येही चर्चेला सुरुवात झाली असून, त्यांच्या व्यवसायावर स्पर्धेचे सावट निर्माण झाले आहे.
महाकाली मंदिर परिसरात यापूर्वीच सुमारे सात वाईन बार आणि तीन देशी दारूची दुकाने सुरू असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत नव्याने स्टॅंडर्ड वाईन शॉप सुरू झाल्याने मद्यविक्री व्यवसायातील व्यावसायिकांची डोकेदुखी वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे.
धार्मिक परिसरात मद्यविक्रीला नागरिकांचा विरोध!
माता महाकाली मंदिर हे केवळ चंद्रपूर शहराचेच नव्हे, तर संपूर्ण विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सव, महाकाली महोत्सव आणि वार्षिक यात्रेदरम्यान येथे भाविकांची मोठी गर्दी होते. वर्षभर महाराष्ट्रासह परराज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीही या परिसरात नियमितपणे येत असतात.
अशा धार्मिक आणि संवेदनशील परिसरात मद्यविक्रीचे दुकान असणे योग्य नसल्याची भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. मंदिर परिसराचे धार्मिक महत्त्व, भाविकांची वर्दळ आणि सामाजिक वातावरणाचा विचार करून संबंधित वाईन शॉपचे स्थलांतर रद्द करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
मुनगंटीवार यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र!
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे संबंधित वाईन शॉपचे स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली आहे. धार्मिक स्थळाचे पावित्र्य, नागरिकांच्या भावना आणि सार्वजनिक सुव्यवस्था लक्षात घेऊन संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तसेच जवळपासच्या बारमालकांनी जून २०२६ मध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पालकमंत्री कार्यालय आणि आमदारांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाईन शॉपची परवानगी रद्द करण्याची तसेच संबंधित मद्यविक्री दुकानांच्या स्थलांतराबाबत फेरविचार करण्याची मागणी होत आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

प्रशासनाचा परवानगीला हिरवा कंदील!
दुसरीकडे, या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दुकानाच्या कागदपत्रांची तपासणी केली असता कोणतीही त्रुटी आढळून आली नसल्याने स्थलांतराला मंजुरी देण्यात आल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित परिसरात सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत मंदिर नसल्याच्या कारणावरून दुकानाला परवानगी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे आता नागरिकांचा विरोध, लोकप्रतिनिधींची मागणी आणि प्रशासनाने दिलेली परवानगी या तिन्ही बाबींच्या पार्श्वभूमीवर पुढे काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
मंदिर परिसरातील वाईन शॉपचा वाद नेमका कोणत्या वळणावर जाणार? नागरिकांच्या आंदोलनाचा इशारा प्रशासन गांभीर्याने घेणार का? आणि आमदारांच्या पत्रानंतर शासन हस्तक्षेप करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, नव्या वाईन शॉपच्या आगमनाने धार्मिक परिसरातील वादाला तोंड फुटले असून, विद्यमान मद्यविक्रेत्यांचीही डोकेदुखी वाढली आहे, हे मात्र निश्चित!