वर्धा नदीपात्रातून बेकायदेशीर रेती उत्खनन!
महसूल विभागालाच रेती तस्करांचे आव्हान?
चंद्रपूर तालुका प्रतिनिधी :
चंद्रपूर तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रातून बेकायदेशीररित्या रेतीचे उत्खनन करून विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचा आरोप होत आहे. पिपरी-धानोरा, मारडा, सेनगाव, आरवड आदी नदीकाठच्या गावांच्या परिसरात वर्षानुवर्षे रेती तस्करी सुरू असल्याने शासनाच्या महसुलावर मोठा डल्ला मारला जात असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकारावर महसूल प्रशासन ठोस कारवाई कधी करणार? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महसूल विभागाकडून यापूर्वी नदीपात्रात रेती वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले रस्ते बुजविण्याची कारवाई करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच हेच मार्ग पुन्हा पूर्ववत करून रेतीची वाहतूक सुरू केली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईला तस्कर जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, काही रेती तस्करांकडून प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याच्या चर्चा केल्या जात आहेत. “महसूल विभागाला दाणापाणी दिले आणि पोलिसांना चाटण दिले की सर्व काही व्यवस्थित होते,” अशा प्रकारची भाषा काही तस्करांकडून केली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, काही रेती तस्करांना राजकीय वरदहस्त असल्याचीही चर्चा परिसरात आहे. त्यामुळे नदीपात्रातून खुलेआम उत्खनन सुरू असतानाही संबंधितांवर कठोर कारवाई का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
पिपरीत मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर उभे करून वाहतुकीला अडथळा?
पिपरी परिसरात एका रेती तस्कराकडून रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर भर रस्त्यात उभे केले जात असल्याने मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार आहे. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मारडा परिसरातील नवीन रस्त्याचीही दुरवस्था
रेती वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची ये-जा होत असल्याने मारडा येथील नुकत्याच झालेल्या रस्त्याची दुरवस्था होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याचे नुकसान होत असल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
पहाटेच्या रेती वाहतुकीमुळे ग्रामस्थ त्रस्त
वर्धा नदीपात्रातून पहाटेच्या सुमारास रेतीचा उपसा करून ट्रॅक्टर गावातून नेले जात असल्याने मोठ्या आवाजामुळे ग्रामस्थांची झोपमोड होत असल्याची तक्रार आहे. शासनाचा महसूल बुडत असतानाच दुसरीकडे गावकऱ्यांना वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था आणि ध्वनीप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असल्याने रेती तस्करांची मुजोरी वाढल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
वर्धा नदीपात्रातील रेती उत्खनन, विनापरवाना वाहतूक, नदीपात्रातील रस्ते आणि संबंधित तक्रारींची महसूल विभागाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच प्रशासनाने कारवाईचा अहवाल सार्वजनिक करावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
