वाद अस्तित्वाच्या खुर्चीचा ! चंद्रपुरातील राजकारण शिगेला, कोण बसणार मनपाच्या सिंहासनावर ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:
महानगर पालिकेची निवडणूक ही दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या वर्चस्वाची लढाई बनलेली आहे.
महानगरपालिकेच्या सिंहासनावर बसण्यासाठी चंद्रपुरातील राजकारणातील अस्तित्वाचा वाद शिगेला गेला आहे. वाद अस्तित्वाच्या खुर्चीचा! दोन्ही राजकीय पक्षांच्या हायकमांडकडून तोडगा निघाला असला तरी या दोन्ही राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये विश्वासाचे वातावरण नसल्याचे दिसू लागले आहे.
महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक मंगळवारी (दि. १०) होणार आहे. निवडणुकीअंती कोण सत्ता स्थापन करणार? कोण महापौर बनणार? हे प्रश्न कायम असले तरी महापौर हा सत्तासंघर्षांच्या लढाईत तापून निघणार, हे मात्र नक्की.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरही कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही पक्षात उमेदवारी, एबी फार्म वाटपापासून सुरू झालेला वाद महापौर पदाचे नामांकन दाखल झाल्यानंतरही संपलेला नाही. त्यामुळे ‘कोळसा खाण’ अशी ओळख असलेल्या शहराचा महापौर नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत तापूण निघणार, अशा चर्चा आता शहरात रंगू लागलेल्या आहेत.
चंद्रपूर महानगर पालिकेसाठी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई आहे. तर भाजपमध्ये माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांच्यावर मात करण्याची लढाई बनलेली आहे. सुरूवातीला दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी वाटपापासून सत्तासंघर्षाची लढाई सुरू झाली. धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्या समर्थकांचे तिकीट कापले. तर जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांच्या निकटवर्तीयांना तिकीट नाकारले.
प्रचाराची धुराही दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळली. मात्र, निकाल लागल्यानंतर भाजप आघाडीला २४ तर काँग्रेस आघाडीला ३० जागा मिळाल्या. श्रेय घेऊन झाले नाही, तर गटनोंदणीसाठी काँग्रेसमध्ये वाद पेटला. सुरेंद्र अडबाले यांना गटनेता केल्याने वडेट्टीवार समर्थकांनी विरोध करत थेट न्यायालयापर्यंत मजल मारली.
अखेर राजेश अडूर यांना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली. वाद येथेचे थांबलेले नाही तर काँग्रेसमध्ये धानोकर यांच्या गटाला महापौरपद तर वडेट्टीवार यांच्या गटाला उपमहापौरपद देण्याचे ठरले. असे असतानाही वडेट्टीवार समर्थकांनी महापौर पदासाठी नामांकन दाखल केले नाही. मात्र, धानोरकर समर्थक नगरसेवकाने उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल केले, तर भाजपमध्ये महापौरपद मुनगंटीवार समर्थक नगरसेवकाला देण्याचे निश्चित झालेले असताना जोरगेवार समर्थक नगरसेवकाने महापौर पदासाठी नामांकन दाखल केल्याने पुन्हा वादाची ठिणगी पडलेली आहे.
उबाटा काँग्रेस सोबत जाण्यास उनुत्सुक असून महापौरांच्या पदासाठी आग्रही आहे. काँग्रेसकडून आता दोन अपक्ष बंडखोर नगरसेवक काँग्रेसचे यांची मनधरणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने उबाठाचे ६ वंचित २, अपक्ष २ असे १० नगरसेवक आहेत. तर एमआयएमचा १ पकडून जनविकास सेनेच्या आघाडीकडे ४ असे संख्याबळ आहे. यांच्यावर भाजप आणि काँग्रेसच्या दोन्ही पक्षाची मदार अवलंबून आहे.
