अखेर, दुर्गापूरचे वादग्रस्त ठाणेदार संदीप एकाडेंची तडकाफडकी बदली
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : दुर्गापूर पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांना अखेर पोलीस प्रशासनाने बदलीचे “इंजेक्शन” दिले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तडकाफडकी आदेश काढत एकाडे यांची दुर्गापूरहून थेट चंद्रपूर पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. या अचानक निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस ठाण्यातील मालमत्ता विक्री, अंतर्गत कारभारातील अनियमितता आणि काही कर्मचाऱ्यांशी वादग्रस्त वर्तन याबाबत एकाडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणाची दखल घेत पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आणि पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी यापूर्वीच सविस्तर अहवाल मागविला होता.
या पार्श्वभूमीवर एकाडे यांना डिफॉल्ट नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर अचानक आज त्यांची दुर्गापूर पोलीस ठाण्यातून बदली करून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात दोनदा कंट्रोल रूममध्ये बसणारे संदीप एकाडे हे पहिलेच ठाणेदार ठरल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या बदलीमागे केवळ प्रशासनिक कारणे नसून आगामी काळात मोठी प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
