जि. प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धेत पंचायत समिती बल्लारपूरची जनरल चॅम्पियनशिप; ‘राजे खांडक्या बल्लाळशहा’ टीमची दमदार कामगिरी




जि. प. अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धेत पंचायत समिती बल्लारपूरची जनरल चॅम्पियनशिप; ‘राजे खांडक्या बल्लाळशहा’ टीमची दमदार कामगिरी

दिनचर्या न्युज :-
बल्लारपूर ,:-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ६, ७ व ८ मार्च रोजी जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे विविध क्रीडा स्पर्धा तर प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धांमध्ये पंचायत समिती बल्लारपूरच्या ‘राजे खांडक्या बल्लाळशहा’ टीमने सक्रिय सहभाग नोंदवत उत्कृष्ट व दमदार कामगिरी केली. विशेषतः राजे खांडक्या बल्लाळशहा व राणी हिराई यांच्या झाकीचे सादरीकरण सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे राजे खांडक्या बल्लाळशहा च्या वेशभूषेत गटविकास अधिकारी धनंजय साळवे व राणी हिराई यांच्या वेशभूषेत त्यांच्या सौभाग्यवती शीला साळवे या होत्या.संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष बल्लारपूरच्या झाकीकडे केंद्रित झाले होते, हे विशेष उल्लेखनीय आहे.
पंचायत समिती स्तरावरील महिला कर्मचाऱ्यांनीही प्रत्येक क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली. व्हॉलीबॉल स्पर्धेत महिला संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गोळाफेक, उंच उडी, धावणे, बॅडमिंटन, कॅरम, झाकी सादरीकरण आदी विविध प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे पंचायत समिती बल्लारपूरला जिल्हास्तरीय जनरल चॅम्पियनशिप मिळवण्यात यश आले.
ही जनरल चॅम्पियनशिप मा.मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, प्रकल्प संचालक मंजिरी मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत मॅडम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश घायगुडे , तसेच इतर विभाग प्रमुख व सर्व गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्यनिष्ठा व संघभावनेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन केले. पंचायत समिती बल्लारपूरचा मान जिल्हास्तरावर उंचावल्याबद्दल सर्व खेळाडू व सहभाग घेतलेल्यांचे त्यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.