चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी शामकांत थेरे यांचा प्रबळ दावा
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संतोषजी कोलकोंडा यांच्याकडे अर्ज सादर
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदासाठी मोरवा येथील माजी सरपंच आणि चंद्रपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष तसेच पक्षाचे निष्ठावान खंदे समर्थक शामकांत सीताराम थेरे यांनी आपला दावा अधिकृतपणे सादर केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक संतोषजी कोलकोंडा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभयजी छाजेड यांची भेट घेऊन थेरे यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठीचे आपले आवेदन पत्र सोपवले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणताही राजकीय वारसा नसताना एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या शामकांत थेरे यांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची यशस्वी सुरुवात केली होती. माजी प्रधानमंत्री स्व. इंदिरा गांधी आणि माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी ऐन तारुण्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आणि तालुका ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. तत्कालीन भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध त्यांनी अनेकदा 'जेलभरो' आंदोलने करून तुरुंगवासही भोगला आहे.
शामकांत थेरे यांचे संघटनात्मक कौशल्य चंद्रपूर जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा संपूर्ण राज्यातून स्व. बाळूभाऊ धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून निवडून आले, तेव्हा थेरे यांनी संघटनात्मक पातळीवर दिलेले योगदान अत्यंत मोलाचे ठरले होते. प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी सातत्याने काम केले आहे. "पदापेक्षा जनसेवा महत्त्वाची असून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी आजही जमिनीवर राहून सामान्यांच्या हक्कासाठी लढत आहे," असे प्रतिपादन थेरे यांनी यावेळी केले.
अर्ज सादर करताना मारडा येथील माजी सरपंच गणपतजी कुडे, राहुल तायडे, चंदूजी माथने, भगवती पिदुरकर, मुकेश अटकरी, संदीप उपरे, संतोष झाडे, विठ्ठल पिंपळकर, प्रभाकर भोयर, भूषण थेरे, ओम थेरे, संजय चौधरी, विनोद जोगी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शामकांत थेरे यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आणि दांडगा जनसंपर्क यामुळे जिल्हा काँग्रेस ग्रामीणच्या अध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
