नागभीड नगरपरिषद परिसरातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त - भाजपचा जनआंदोलनाचा इशारा..!
मुख्याधिकाऱ्यांनी त्वरित उपायोजना कराव्या अन्यथा जन आंदोलन - भाजप नगरसेवक
दिनचर्या न्युज :-
नागभीड : शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपरिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख यांना निवेदन
सादर केले आहे. नगरपरिषद निवडणुकीनंतर जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही शहरातील अनेक मूलभूत प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरात नियमित व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांत ७-८ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. तसेच नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून डासांचे प्रमाण वाढत आहे. मोकाट डुकरांचा व जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, गरजुना मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे, घरकुल लाभार्थ्यांचे निधी वितरीत करण्यात यावा, कर न भरलेल्या नागरिकांचे कापलेले नळ कनेक्शन पूर्ववत करावे व कोणतेही नळ कनेक्शन कापू नये, खैरीचक व पंचायत समिती भागातील नळ जोडणी त्वरित करावी,याशिवाय, घरपट्टी व पाणीपट्टी बिलांबाबत तत्काळ दुरुस्ती, शहरात नियमित फवारणी, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती, ओपन स्पेस व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच नळ कनेक्शन व इतर कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबतही तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांवरील मोकाट जनावरांचा प्रश्न, तसेच साफसफाईसाठी अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. विविध भागांमध्ये साचलेला कचरा व गटारांची दुर्दशा यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
वरील सर्व समस्यांवर तात्काळ उपाययोजना करून शहरातील परिस्थिती सुधारावी, अन्यथा नागरिकांच्या सहकार्याने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप नगरसेवकांनी दिला आहे.
निवेदन देताना भाजपा गटनेते तथा नगरसेवक गणेश तर्वेकर, नगरसेवक अवेश पठाण, नगरसेवक सचिन आकुलवार, नगरसेवक हेमंत नन्नावरे, नगरसेविका प्रिया लांबट, नगरसेविका शिल्पा शेंडे, स्वीकृत नगरसेवक प्रा. डॉ. अमीर धमानी सर उपस्थित होते.
