भद्रावतीतील शेतकरी आत्महत्येप्रकरणी २० मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
जोपर्यंत धानोरकर परिवार व संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल होतं नाही तोपर्यंत वंदना मेश्राम व मुलगा स्वप्नील मेश्राम आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा.
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भद्रावती तालुक्यातील मौजा कुरोडा येथील गट क्रमांक ९५ व ९८ मधील शेतीच्या वादातून शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या प्रकरणात अद्याप न्याय न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मृतकाची पत्नी वंदना मेश्राम व मुलगा स्वप्नील मेश्राम हे दिनांक २० मे २०२६ पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रथम ठिय्या साखळी आंदोलन व त्यानंतर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मौजा कुरोडा येथील गट क्रमांक ९५ व ९८ ही शेती काँग्रेसचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या नावाने असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपानुसार, परमेश्वर मेश्राम यांची शेती अल्प पैसे देऊन व दारू पाजून त्यांच्या नावावर विक्री करून घेण्यात आली. त्यानंतर सातबारा फेरफार करून सदर जमीन पुढे तत्कालीन भद्रावती नगरपरिषद नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या नावाने विक्री करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
या व्यवहाराविरोधात परमेश्वर मेश्राम यांच्या भावांनी दिवाणी न्यायालयात आणि नंतर जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने मेश्राम कुटुंबाच्या बाजूने निर्णय दिला. मात्र, त्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात स्थगिती आणण्यात आली.
दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय मेश्राम कुटुंबाच्या बाजूने लागूनही स्थानिक तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी जमिनीचा फेरफार केला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून परमेश्वर मेश्राम यांनी भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती.
मेश्राम यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूनंतर पत्नी व मुलांना न्याय द्यावा तसेच संबंधित जमीन त्यांच्या नावावर करण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, घटनेला सात महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधित दोषींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. पीडित कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे प्रावधान असतानाही अद्याप मदत मिळाली नसल्याने कुटुंबीयांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या प्रकरणी स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर परिवार,अनिल धानोरकर तसेच संबंधित महसूल अधिकाऱ्यांवरगुन्हे दाखल होऊन कारवाई होतं नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा वंदना मेश्राम यांनी दिला आहे.
