महसूल विभागाचा लोकसहभागातून वनराई बंधारा निर्मिती;
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानाला चंद्रपूरमध्ये लोकचळवळीचे स्वरूप
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर | दिनांक : १७ ऑक्टोबर २०२६
चंद्रपूर : पाणी हीच जीवनाची खरी संपत्ती असून, पाण्याचे संवर्धन आणि भूजल पातळीत वाढ करणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने महसूल विभाग, चंद्रपूर अंतर्गत तहसील कार्यालय, चंद्रपूर व चंद्रपूर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरवट-शिवणी येथील सराई नाला येथे लोकसहभागातून श्रमदान करत भव्य वनराई बंधारा निर्मितीचा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. ५० मीटर लांब, २५ मीटर रुंद आणि अंदाजे २ मीटर खोल असणाऱ्या या बंधाऱ्यामुळे परिसरात मुबलक पाणी साठवले जाणार आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविणे, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग भूजल पुनर्भरणासाठी करणे तसेच जलसंवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
हा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी, चंद्रपूर, श्रीमती वसुमना पंत यांच्या आदेशानुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. या श्रमदान कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी श्री. विशाल कुमार मेश्राम, तहसीलदार श्री. विजय पवार, नायब तहसीलदार श्री. राजू धांडे व श्री. ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी श्री. प्रवीण वरभे, तालुका कृषी अधिकारी श्री. अनिकेत माने व त्यांची टीम, *जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख* पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी, पोलीस पाटील, सरपंच, चंद्रपूर मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी, आरवट येथील तलाठी श्री. अनूप वघारे, श्री. योगेश सागुळले आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा प्रकारच्या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडविण्यास मदत होते, जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढते आणि परिसरातील जलस्रोतांचे संवर्धन होण्यास हातभार लागतो. विशेषतः पाणीटंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा स्थानिक व लोकसहभागावर आधारित उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरतात.
जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणारे असे उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक बांधिलकी, सामूहिक जबाबदारी आणि ग्रामविकासाची भावना अधिक दृढ करतात.
“थेंब थेंब पाणी वाचवूया, जलसमृद्ध भविष्य घडवूया!” या संकल्पनेतून नागरिकांनी जलसंवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
