दीक्षाभूमीच्या विकासाला विरोध करणारा ‘व्हिलन’ कोण - किशोर जोरगेवार
वर्क ऑर्डर निघताच आंदोलन, सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर मार्गी लागलेल्या विकासकामाला अडथळा का?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी तब्बल सहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करून अखेर पहिल्या टप्प्यात ६९ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. १४ ऑगस्ट रोजी विकासकामाची वर्क ऑर्डरही काढण्यात आली. मात्र वर्क ऑर्डर निघून अवघे दोन-तीन दिवस होत नाही तोच दीक्षाभूमीशी संबंधित संस्थेच्या विरोधात आंदोलन सुरू झाले. विकासकाम मार्गी लागण्याच्या निर्णायक टप्प्यावरच आंदोलन उभे राहिल्याने या संपूर्ण घटनाक्रमाच्या ‘टायमिंग’वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, दीक्षाभूमीच्या विकासकामाला विरोध करणारा ‘व्हिलन’ कोण? असा थेट सवाल आमदार किशोर जोरगेवार यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या महानगर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार किशोर जोरगेवार यांनी दीक्षाभूमीच्या विकासासाठी केलेल्या पाठपुराव्याचा संपूर्ण घटनाक्रम मांडला. नागपूरनंतर चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा दिली. त्यामुळे चंद्रपूरची दीक्षाभूमीही ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास झाला मात्र चंद्रपूरची दीक्षाभूमी अपेक्षित विकासापासून वंचित राहिली. त्यामुळे आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात आपण दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती, असे जोरगेवार यांनी सांगितले.
यानंतर निधी मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र प्रत्येक टप्प्यावर काही ना काही अडचणी निर्माण झाल्याने हे काम रखडले. तीन वर्षांपूर्वी सुरू होणे अपेक्षित असलेले काम प्रत्यक्षात मार्गी लागण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. उपलब्ध त्रुटी आणि आवश्यक बाबींची पूर्तता करत आपण पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर त्याचे फलित म्हणून १४ ऑगस्ट रोजी कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र वर्क ऑर्डर निघाल्यानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांत दीक्षाभूमीशी संबंधित संस्थेविरोधात आंदोलन सुरू झाले. सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विकासकाम प्रत्यक्ष सुरू होण्याच्या टप्प्यावर पोहोचले असताना अचानक आंदोलन सुरू होण्याचे टायमिंग अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे, असे आमदार जोरगेवार म्हणाले. या आंदोलनामागे कोण आहे, त्यांनी संपूर्ण घटनाक्रमाची वस्तुनिष्ठपणे दखल घेण्याची गरज व्यक्त केली.
दीक्षाभूमीशी संबंधित संस्थेच्या अंतर्गत वादाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे आमदार जोरगेवार यांनी ठामपणे स्पष्ट केले. आमचा संस्थेशी किंवा त्यांच्या अंतर्गत वादाशी कोणताही संबंध नाही. मात्र त्यांच्या वादाचा परिणाम दीक्षाभूमीच्या विकासावर होता कामा नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन गटांमधील वादात जर विकासकाम अडकले, तर त्याचा फटका कोणत्याही व्यक्तीला नव्हे, तर चंद्रपूरच्या जनतेला आणि दीक्षाभूमीच्या विकासाला बसणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी मिळविण्यापासून ते वर्क ऑर्डर काढण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. मतदारसंघात अनेक विकासकामे केली, मात्र एखाद्या कामासाठी इतक्या अडचणींचा सामना कधी करावा लागला नाही, असेही जोरगेवार यांनी सांगितले. एकीकडे निधी मंजूर करण्यासाठी अडथळे, दुसरीकडे वर्क ऑर्डर निघताच आंदोलन मग या संपूर्ण घटनाक्रमामागे नेमके कोणते घटक कार्यरत आहेत, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले.
दीक्षाभूमी ही केवळ चंद्रपूरची नव्हे तर राज्यातील आणि देशातील लाखो अनुयायांच्या श्रद्धेशी जोडलेली ऐतिहासिक भूमी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेतील वादामुळे या पवित्र स्थळाचा विकास रखडता कामा नये. वैयक्तिक अथवा संस्थात्मक वाद बाजूला ठेवून दीक्षाभूमीचा विकास हा केंद्रबिंदू असला पाहिजे. विकासकामाला विरोध करणारे नेमके कोण आहेत आणि या कामाला वारंवार अडथळे का निर्माण होत आहेत, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, अशी भूमिका आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
दरम्यान, मंजूर निधीतून नियोजित विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट असून विकासकामाबाबत समाजाकडून काही सुचना आल्यास त्यांचीही दखल घेतल्या जाईल असे ते यावेळी म्हणाले.
