गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदारांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह!
पूर्वीच्या खासदारांपेक्षा जनसंपर्क कमी झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा; विकासकामांबाबतही नाराजी
दिनचर्या न्यूज | चिमूर प्रतिनिधी
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदारांच्या जनसंपर्क आणि मतदारसंघातील उपस्थितीबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. खासदारांच्या आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे जनसंपर्क कमी झाल्याचे काही नागरिकांकडून सांगण्यात येत असून, त्याचा परिणाम मतदारसंघातील विकासकामांच्या पाठपुराव्यावर होत असल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता, अनेकांनी पूर्वीच्या खासदारांच्या कार्यपद्धतीची तुलना विद्यमान खासदारांशी केली. पूर्वी खासदार कार्यालयात उपस्थित नसले तरी कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी असायची आणि विविध समस्यांवर पाठपुरावा केला जात होता, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
मात्र, विद्यमान खासदारांच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे नागरिकांची वर्दळ दिसत नसल्याची चर्चा आहे. कार्यालयीन कर्मचारी उपस्थित असले तरी खासदार स्वतः मतदारसंघात उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी अडचणी येत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
खासदार अनेकदा नागपूर येथे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील नियमित दौरे, नागरिकांच्या भेटीगाठी आणि विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, खासदारांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कार्यालयातील काही निकटवर्तीय व कार्यकर्ते कामकाज पाहत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, केवळ कार्यालयीन पातळीवर नागरिकांच्या समस्या सोडविणे शक्य नसून, खासदारांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि प्रशासनाकडे विकासकामांचा पाठपुरावा आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
“पूर्वीचे खासदार बरे होते का?”
अनेक नागरिकांमध्ये आता पूर्वीच्या खासदारांच्या कार्यपद्धतीची आठवण काढली जात असून, “पूर्वी कार्यालयात कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी असायची, समस्यांवर चर्चा व्हायची आणि पाठपुरावाही होत होता. आता परिस्थितीत बदल जाणवतो,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
विशेष म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान खासदारांच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर येणे अपेक्षित आहे. मतदारसंघातील विकासकामे, खासदारांचा जनसंपर्क आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा यावरच आगामी काळात जनतेचा निर्णय अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, या संदर्भातील नागरिकांच्या आरोपांवर विद्यमान खासदार किंवा त्यांच्या कार्यालयाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल
