ओपन स्पेसवरील अवैध बांधकाम तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन; महिलांचा इशारा




ओपन स्पेसवरील अवैध बांधकाम तात्काळ थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन; महिलांचा इशारा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:शहरातील गायत्रीनगर, वडगाव फाटा येथील सर्व्हे क्र. ८८/२ मधील मोकळ्या जागेवर (ओपन स्पेस) सुरू असलेले अवैध बांधकाम ताबडतोब थांबवण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मनपा आयुक्त अकणुरी नरेश यांना सादर करण्यात आले आहे. हे अवैध बांधकाम न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या छाया धनविजय यांनी पत्र परिषदेत दिला आहे.

गायत्रीनगर वडगाव फाटा येथील सर्व्हे नंबर ८८/२ मधील या ओपन स्पेसचा वापर परिसरातील लहान मुले, युवक आणि नागरिक अनेक वर्षांपासून खेळ, व्यायाम व इतर सार्वजनिक उपयोगासाठी करत आहेत. या भागातील मुलांसाठी हीच जागा शिल्लक असून ती अत्यंत महत्त्वाची आहे.
सध्या या जागेवर पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असलेले अवैध बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम नेमके कोण करत आहे, याची स्पष्ट माहिती नाही. तरीही हे अवैध बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे आणि येथे नागरिकांच्या सुविधेसाठी वाचनालय (लाइब्ररी) बांधण्यात यावे, अशी मागणीही महिलांनी केली आहे.
यापूर्वी २०१६ मध्येही काही लोकांनी या मोकळ्या जागेवर बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक आंदोलनाच्या भूमिकेमुळे ते बांधकाम रोखण्यात आले होते. आता पुन्हा काही लोकांकडून या जागेवर अवैध बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
अवैधरीत्या सुरू असलेले हे बांधकाम ताबडतोब बंद करण्यात यावे, यासाठी मनपा आयुक्तांसह जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच नगरसेविका प्रतीक्षा येरगुडे, नगरसेवक संजय बल्की आणि मनीषा बोबडे यांनाही निवेदन देऊन लक्ष देण्यात आले. हे बांधकाम बंद न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असे पत्र परिषदेत स्पष्ट करण्यात आले. या प्रसंगी यशोधरा पोटनवार, डॉ. प्रतिमा खोब्रागडे, माया आमटे आणि अशोक मुळे प्रामुख्याने उपस्थित होते.