वरिष्ठ राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबई शहराचा दणदणीत ठसा
वाको इंडिया राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६
दिनचर्या न्युज :-
मुंबई : मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वाको इंडिया राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ – वरिष्ठ व मास्टर्स तसेच प्रथम पॅरा राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये मुंबई शहरातील किकबॉक्सिंगपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मुंबईच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला. स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन, मुंबई शहरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंनी सामान्य तसेच पॅरा गटात कौशल्य, शिस्त, जिद्द आणि आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत विविध पदकांची कमाई केली. या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील २८ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. देशभरातील नामांकित खेळाडूंच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी विविध किकबॉक्सिंग प्रकारांत प्रभावी कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
मुंबईच्या खेळाडूंनी पॉइंट फाइट, लाईट कॉन्टॅक्ट, किक लाईट, लो किक आणि सांघिक पॉइंट फाइट या प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली. विन्स पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तीन पदके पटकावली. अश्विनी जांबले यांनी सुवर्ण आणि कांस्य अशी दोन पदके मिळविली. हर्ष साळेकर यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तृष्णा नाईक यांनी दोन कांस्यपदकांची कमाई केली, तर दर्शना आगवणे यांनी कांस्यपदक पटकावले. प्राज्ञेश एम. पटवर्धन यांनी पॉइंट फाइट प्रकारात मुंबई शहराचे प्रतिनिधित्व केले.
दरम्यान, प्रथम पॅरा राष्ट्रीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये मुंबईच्या पॅरा किकबॉक्सिंगपटूंनीही आपल्या जिद्दीची, चिकाटीची आणि क्रीडा कौशल्याची प्रभावी छाप पाडली. विनोद रावत, सुधाकर पाटील आणि हेमलताबेन मच्छी यांनी सुवर्णपदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. रोहित मोरे आणि मुरुगेश यांनी रौप्यपदके पटकावली, तर अमन थलारी यांनी कांस्यपदक मिळवून मुंबईच्या पदकतालिकेत भर घातली.
या खेळाडूंना स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन, मुंबई शहरच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण देण्यात आले. खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसोबतच तांत्रिक कौशल्य, डावपेच, वेग, अचूकता आणि मानसिक तयारीवर विशेष लक्ष देण्यात आले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश मुरकर तसेच आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक विघ्नेश मुरकर यांनी खेळाडूंच्या तयारीसाठी विशेष मेहनत घेतली. प्रशिक्षक आशिष महाडिक हे देखील राष्ट्रीय संघासोबत उपस्थित होते. खेळाडूंच्या प्रशिक्षणाला आणि त्यांच्या क्रीडा प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टने मोफत प्रशिक्षणासह आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. या सहकार्यामुळे विविध आर्थिक स्तरांतील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण घेऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
मुंबईच्या खेळाडूंनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाको इंडिया अध्यक्ष संतोष कुमार अग्रवाल आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
