चंद्रपुरात छोटा नागपूर, चारगाव परिसरात विटाभट्ट्यांचा हदोस! परवानगीविना विटानिर्मितीचा आरोप; माती, राख,प्रदूषण, पाण्याचा वापर व बालमजुरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?



चंद्रपुरात छोटा नागपूर, चारगाव परिसरात विटाभट्ट्यांचा हदोस!

परवानगीविना विटानिर्मितीचा आरोप; माती, राख,प्रदूषण, पाण्याचा वापर व बालमजुरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?

चंद्रपूर | दिनचर्या न्यूज प्रतिनिधी

चंद्रपूर शहरालगतच्या चारगाव व छोटा नागपूर परिसरात, सीटीपीएस रोडलगत मोठ्या प्रमाणावर विटाभट्ट्यांचा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिसरात जवळपास २५ ते ३० विटाभट्ट्या सुरू असून, संबंधित विटाभट्ट्यांना आवश्यक परवानग्या आहेत का, याची प्रशासनाने तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या विटाभट्ट्यांसाठी माती, सीटीपीएसमधून उपलब्ध होणारी राख तसेच लगतच्या नाल्यातील पाण्याचा वापर केला जात असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या परिसरात विटानिर्मितीचा व्यवसाय सुरू असल्याचे सांगितले जात असून, इतक्या कालावधीत महसूल व पर्यावरण विभागाने ठोस कारवाई का केली नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
कोळशाच्या वापरामुळे प्रदूषणाचा धोका
मातीच्या विटा भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इंधनाचा वापर केला जातो. काही विटाभट्ट्यांमध्ये कोळशाचा वापर होत असल्याने धूर व धुळीमुळे परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः शेतजमिनी व रहिवासी भागाच्या जवळ विटाभट्ट्या सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शेती पिकांवर परिणाम होत असल्याचा आरोप आहे.
पाण्याचा वापर नेमका कोणाच्या परवानगीने?
एकीकडे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते. मात्र विटानिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत असल्याचे सांगण्यात येते. या पाण्याचा स्रोत कोणता आणि त्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी कोणती परवानगी घेतली आहे, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

विटाभट्ट्यांवर बालमजुरीचा आरोप
या व्यवसायात काम करणाऱ्या काही मजूर कुटुंबांसोबत अल्पवयीन मुलेही काम करीत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. हा आरोप खरा असल्यास संबंधित विभागांनी तातडीने तपासणी करून बालकामगार आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आदिवासी कुटुंबांच्या जमिनी भाड्याने?
विटाभट्टी व्यावसायिकांनी विशेषतः आदिवासी कुटुंबांच्या जमिनी व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. या जमिनींचा वापर कोणत्या अटी व परवानग्यांनुसार केला जात आहे, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सीटीपीएस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप
या परिसरातील काही विटाभट्ट्यांच्या व्यवसायात सीटीपीएसमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच सीटीपीएसचा कोळसा विटा भाजण्यासाठी वापरला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असल्याचे सांगण्यात येते. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज आहे.
एकाच भट्टीत लाखो विटांचे उत्पादन?
काही विटाभट्टीधारकांकडूनच एका भट्टीत वर्षाला मोठ्या प्रमाणात, ५० लाखांहून अधिक विटांचे उत्पादन होत असल्याची माहिती दिली जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्यास शासनाचा महसूल, पर्यावरणीय नियम आणि उत्पादनाशी संबंधित परवानग्यांची काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या विटाभट्ट्यांवर महसूल प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित विभागांनी आतापर्यंत नेमकी कोणती कारवाई केली? विटाभट्ट्यांना आवश्यक परवानग्या आहेत का? पाण्याचा व मातीचा वापर कायदेशीर आहे का? बालकामगारांच्या आरोपांची चौकशी झाली आहे का? सीटीपीएस कर्मचाऱ्यांचा किंवा कोळशाचा वापर होत असल्याच्या आरोपात तथ्य आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने देणे गरजेचे आहे.
चारगाव-छोटा नागपूर परिसरातील विटाभट्ट्यांमुळे नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणावर परिणाम होत असल्याच्या तक्रारींची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. आता जिल्हा प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित विटाभट्ट्यांची चौकशी व कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.