गणेशोत्सवात महाप्रसादासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर सक्तीचा; चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे निर्देश



गणेशोत्सवात महाप्रसादासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर सक्तीचा; चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे निर्देश

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
आगामी गणेशोत्सव आणि येणाऱ्या सार्वजनिक उत्सवांमध्ये विविध मंडळांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद व भोजनासाठी केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर रोखण्यासाठी आणि संभाव्य भीषण अपघात टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना कडक निर्देश दिले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाबी:
अनेक गणेश मंडळे अज्ञानापोटी किंवा दुर्लक्षामुळे महाप्रसाद तयार करताना घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतात. यावर प्रशासनाने खालील धोके स्पष्ट केले आहेत:
* अपघाताचा धोका: घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या बर्नर आणि गॅस प्रेशरमध्ये मोठा फरक असतो. भंडारखान्यात मोठ्या भांड्यांसाठी घरगुती सिलेंडर वापरल्यास भीषण अपघात घडून मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.
* विमा संरक्षण नाकारले जाणे: दुर्देवाने अपघात घडल्यास घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर वापर झाल्याचे सिद्ध झाल्यास कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण मिळत नाही.
* फौजदारी कारवाई: घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक किंवा सार्वजनिक कामासाठी वापर करणे हा 'जीवनावश्यक वस्तू कायद्या'नुसार गुन्हा आहे. अपघात झाल्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात.
महसुलाचे नुकसान: अनुदानावर मिळणाऱ्या घरगुती गॅसचा गैरवापर झाल्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होते.
प्रशासकीय आदेश व अटी:
परवानगी पत्रात अट: सार्वजनिक गणेश मंडळ व इतर संस्थांना मंडप, ध्वनी किंवा महाप्रसादाची परवानगी देताना (विशेषतः पोलीस प्रशासन, पालिका व पुरवठा विभागाकडून) महाप्रसादासाठी केवळ व्यावसायिक सिलेंडरचाच वापर करणे बंधनकारक राहील, ही अट स्पष्टपणे समाविष्ट केली जाईल.

पूर्वसूचना व परिपत्रक: स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे परिपत्रक काढून सर्व गणेश मंडळांना याविषयी पूर्वकल्पना द्यावी.
अहवाल सादरीकरण: सर्व तहसीलदारांनी आपल्या तालुक्यातील गणेश मंडळांना सूचित करून केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ जिल्हा कार्यालयास सादर करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. आर. आर. बहादूरकर यांनी दिले

"श्रीगणेशोत्सव हा आपला पवित्र आणि आनंदाचा सण आहे, परंतु महाप्रसाद तयार करताना सुरक्षेशी अजिबात तडजोड केली जाऊ नये. घरगुती सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरची क्षमता तसेच बर्नरच्या प्रेशरमध्ये जमीन-आस्मानचा फरक असतो. मोठ्या भांड्यांसाठी घरगुती सिलेंडर वापरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. जिल्हा प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेत हा कडक निर्णय लागू केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. माझी सर्व गणेश मंडळांना नम्र विनंती आहे की, कायदा आणि सुरक्षेचे पालन करत केवळ व्यावसायिक सिलेंडरचाच वापर करावा, जेणेकरून बाप्पाचा हा उत्सव प्रत्येकासाठी सुरक्षित आणि आनंदाचा ठरेल."*
*नितीन सोळंके (संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशन)