बदलत्या वीज क्षेत्रासाठी महावितरण सज्ज; तत्पर ग्राहकसेवा, महसूलवाढ, शून्य थकबाकीला प्राधान्य द्या संचालक श्री. धनंजय औंढेकर यांचा जनमित्रांशी थेट संवाद


बदलत्या वीज क्षेत्रासाठी महावितरण सज्ज; तत्पर ग्राहकसेवा, महसूलवाढ, शून्य थकबाकीला प्राधान्य द्या
संचालक श्री. धनंजय औंढेकर यांचा जनमित्रांशी थेट संवाद

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर / गडचिरोली, दि. १८ सप्टेंबर २०२६: बदलत्या काळासोबत महावितरणनेही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे. यासोबतच महसूलवाढ, शून्य थकबाकी आणि वीजहानी कमी करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी केले. स्मार्ट मीटर, छतावरील सौरऊर्जा आणि बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून वीज क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत असल्याची माहिती त्यांनी जनमित्रांशी झालेल्या थेट संवाद कार्यक्रमात दिली.
चंद्रपूर आणि गडचिरोली येथे आयोजित स्वतंत्र कार्यक्रमात संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी प्रामुख्याने तांत्रिक कर्मचाऱ्यांसह अभियंते व अधिकाऱ्यांशी नुकताच थेट संवाद साधला. यावेळी चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज धाबर्डे (चंद्रपूर) व श्री. प्रकाश खांडेकर (गडचिरोली), श्री. रमेश सानप (इन्फ्रा) यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी महावितरणचे मिशन आणि व्हिजन स्पष्ट करत कंपनीच्या वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वीजचोरीविरुद्ध महावितरणने अत्यंत आक्रमक भूमिका स्वीकारली असून ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरूच ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. वीज वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविणे, वीजग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा देणे आणि कंपनीच्या महसुलात वाढ करणे हे अत्यंत महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संचालक श्री. औंढेकर म्हणाले, वीज वितरण क्षेत्रातील ग्राहकाभिमुख बदल म्हणून स्मार्ट मीटर अत्यंत महत्वाचे आहे. स्मार्ट मीटर बसविण्यासोबतच त्याचे प्रत्यक्ष फायदे ग्राहकांना समजावून सांगणे देखील आवश्यक आहे. स्मार्ट मीटरमुळे विजेच्या वापराबाबत ग्राहकांना अधिक अचूक व पारदर्शक माहिती उपलब्ध होईल. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचे गैरसमज दूर करण्यासाठी ग्राहक समाधान मेळावे घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, भविष्यात विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे अनिवार्य आहे. यासाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजना आणि स्मार्ट सोलर योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा यासाठी व्यापक जनजागृती करण्यात यावी. सौरऊर्जेमुळे ग्राहकांच्या वीज खर्चात थेट बचत होईल आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराला मोठा हातभार लागेल असे संचालक श्री. औंढेकर यांनी सांगितले.
वीज क्षेत्राच्या बदलांमध्ये ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत आहे. सौर ऊर्जेची निर्मिती प्रामुख्याने दिवसाच्या वेळात होत असल्याने रात्रीच्या वेळी विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी दिवसा निर्माण झालेली अतिरिक्त वीज बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून साठवून ठेवून गरजेनुसार वापरणे भविष्यात अत्यंत आवश्यक ठरणार आहे. यासोबतच भविष्यातील वीज निर्मितीमध्ये हायड्रोजनसारख्या पर्यायी इंधनांचा वापर, अक्षय ऊर्जेचा वाढता वाटा आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे ऊर्जा क्षेत्राचे स्वरूप बदलणार असल्याचे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी सांगितले.
यावेळी मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे म्हणाले, वीज क्षेत्रात वेगाने होणारे तांत्रिक बदल लक्षात घेता महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. वीज ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने, जबाबदारीने व सांघिक भावनेने काम करणे हेच महावितरणच्या यशाचा खरा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता सुहास पडोळे (चंद्रपूर), महेशचंद्र तेलंग (बल्लारशाह), विलास नवघरे (वरोरा), हितेश पारेख (गडचिरोली), जितेंद्र वाघमारे (आलापल्ली), भारतभूषण औघड (ब्रह्मपुरी) यांच्यास अभियंते, अधिकारी व तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
फोटो नेम – MSEDCL Thet Sanwad Chandrpur 18-09-2026
फोटो ओळ – महावितरणच्या वाटचालीवर संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी प्रामुख्याने जनमित्रांसह अभियंते व अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता श्री. हरिश गजबे उपस्थित होते.